.

.

.

कसं विसरावं देवा?

बाप हानतो तिफन
माय पेरिती दाणं…
कसं विसरावं देवा?
काळ्या माईचं देणं…

कशी तिफन ओढती
डौलदार बैल दोनं…
कसं विसरावं देवा?
ढवळ्या गाईचं देणं…

कुठं तिफन आडली
धावतचं येतो कोण
कसं विसरावं देवा?
सख्या शेजाऱ्याचं देणं…

मळा फुलला हिरवा
बांधावर गाते गाणं…
कसं विसरावं देवा?
काळ्या कोकिळेचं देणं…

शेत भरलं ज्वारीनं
पदरात आलं दान…
कसं विसरावं देवा?
निळ्या आभाळाचं देणं…

©मोतीराम पौळ
दि. २९.०६.२०१६